शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही नेमकी कुणाची आहे? याचा फैसला आता थेट केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत पराकोटीचे अंतर्गत मतभेद बघायला मिळत आहेत. सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेनेत उभी फुट पडल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजपसोबत हातमिळवणी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. आपण शिवसेनेत असून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा-लोकसभेतील गटनेते ते प्रतोद आपलेच असल्याचा दावा केला आहे. या गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाण्यावरही दावा केला आहे. दोन्ही बाजूने आपलीच सेना ही खरी शिवसेना आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची? याबाबतचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या दारात होणार आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. बंडखोर शिवसेनेच्या आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान राज्यात नवं सरकार स्थापन होवून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
या सर्व राजकीय घडामोड पाहता निवडणूक आयोगाने या प्रकरणाता महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.