संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आता आधीच योग्य ती पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, केंद्राने राज्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आतापर्यंत नवीन व्हेरयंटचा एकही राज्यात रुग्ण रेकॉर्डवर नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच मेडिकल यंत्रणा तयारीत आहे. आपल्याकडे कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे आतापर्यंत देशात चार रुग्ण सापडले आहेत. मात्र, राज्यात अजून एकही रुग्ण नाही.
जिल्हा आरोग्य केंद्र ते मनपाला टेस्टिंग, ट्रॅकिंगवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागातील जी रिक्त पदे रिक्त आहेत ती भरण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच ते पुढे म्हणाले की, इतर देशातून जे पर्यटक येत आहे, त्यांची थर्मल चाचणी केली जाणार आहे. त्यात काही दोष असेल तर त्यांना आयसोलेशन करण्याच्या सूचना दिले आहेत. उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्यासोबत या संदर्भात बैठक होणार आहे. त्यानंतर मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.