मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी मनीपूरच्या थम्बलानू उच्च माध्यमिक विद्यालयाचे होते. बुधवारी सर्व विद्यार्थी दोन बसमधून नोनी जिल्ह्यातील खापूम येथे शालेय अभ्यास दौऱ्यासाठी जात होते. यावेळी अपघात घडून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना राज्याची राजधानी इंफाळपासून ५५ किमी अंतरावरील लोंगसाई परिसरात घडली.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, थम्बलानू उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी एका बसमधून प्रवास करत होते. तर शाळेच्या विद्यार्थिनी दुसऱ्या बसमधून प्रवास करत होत्या. डोंगराळ रस्त्याच्या एका तीव्र वळणावर विद्यार्थिनी प्रवास करत असलेल्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात घडला. एका तीव्र वळणावर बस उलटून पाच विद्यार्थिंनीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध वाहनांतून जखमी विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी राजधानी इम्फाळ येथे नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी बस अपघाताचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “आज जुन्या काछर रस्त्यावर शाळकरी मुलांच्या बसला अपघात झाल्याचं ऐकून अतिव दुःख झालं. एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि स्थानिक आमदार बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमधील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो.