गुहागर तालुक्यामध्ये कोरोनाची लागण झालेली असतानाही नवरदेवानं विवाह सोहळा साजरा केला. त्यामुळे अनेकांमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर ग्रामपंचायतीनं वरातीमागून घोडे नाचवत नंतर ५० हजारांच्या दंडाची वसुली केली.गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील नवरदेवाचे दोन दिवसांपूर्वी लग्न होणार होते.
त्यामुळं लग्नासाठी नवरी मुलीकडील १० जण आणि नवरदेवाकडील १० जण अशा सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश होते. त्यानुसार दोन्ही बाजुच्या लोकांनी चाचणी केली.मात्र या चाचणीच्या निकालांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, नवरदेव पॉझिटिव्ह आला.
रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनानं नवरदेवाला होम आयसोलेशनमध्ये किंवा कोविड सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. लग्न पुढं ढकलण्यासही सांगण्यात आलं. अगदीच लग्न पुढं ढकलणं शक्य नसेल तर प्रशासनाची परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले.लग्नाच्या एका दिवसापूर्वीच नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यावर सगळे काळजीत पडले. मात्र नवरदेवाने कशाचीही पर्वा न करता लग्न उरकायचं ठरवलं. इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारा हा विवाह सोहळा अनेक तास सुरु होता.
प्रकारानंतर प्रशासनानं वरातीमागून घोडं नाचवायचं म्हणून शासकीय नियमांचं पालन न केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली. ग्राम कृतीदलानं ५० हजारांचा दंड वसूल केला.