बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. बेबी मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उत्तराखंड राज्याच्या राज्यपालपदी सेवानिवृत्त ले. जनरल. गुरमित सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांच्याकडे पंजाबचा कार्यभार देण्यात आला आहे.
बेबी राणी मौर्य यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. यामध्ये उत्तराखंड, पंजाबसह इतर राज्यांचा समावेश आहे. बेबी राणी मौर्य यांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. 26 ऑगस्ट 2018 रोजी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती.
बेबी राणी मौर्य यांनी आपल्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप मौर्य यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याचा विचार करत असल्याचेही राजकीय जाणकार सांगत आहेत.
राज्यपालपदांंमध्ये काय फेरबदल करण्यात आले ?
आर. एन रवी यांच्याकडे नागालँडचे राज्यपालपद होते. मात्र, आता त्यांना तामिळनाडू राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर आसामचे विद्यमान राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे नागालँडच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभर देण्यात आलाय.