सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपलं बळ दाखवलं होतं. जिल्हा परिषदेच्या 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे.
पालघरमध्ये 15 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीला चार आणि इतरांना एका जागेवर विजय मिळाला आहे. पालघरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. पालघरमध्ये शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. भाजपच्या एका जागेत वाढ झाली आहे. तर माकपने त्यांची एक जागा कायम राखली आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली आहे. तर या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाली होती. मात्र, या युतीचा भाजपला काहीच फायदा झाला नाही. त्यामुळेही ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली.
नागपूरच्या 16 जागांपैकी भाजपने 3, राष्ट्रवादीने 2, काँग्रेसने 9 आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही. नागपूर जिल्हाा परिषदेत काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर भाजलाही एक जागा गमवावी लागली आहे. शेकाप आि इतर पक्षांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम राहणार असून मंत्री सुनी केदार यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
धुळे भाजपचेच
धुळ्यात 15 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 8, काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याने धुळे झेडपीत भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मात्र असं असलं तरी भाजपला या निवडणुकीत 3 जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांचा फायदा झाला आहे. याशिवाय काँग्रेस आणि शिवसेनेने आपापल्या जागा राखल्या आहेत. भाजप आमदार अमरीश पटेल यांचं शिरपूरमध्ये वर्चस्व कायम असून गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी झाल्या आहेत.
नंदूरबारमध्ये आघाडीची सत्ता?
नंदूरबारमध्ये 11 जागांपैकी भाजपने 4, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 3 आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे. नंदूरबार झेडपीमध्ये भाजपने 3 जागा गमावल्या आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी नंदूरबार जिल्हा परिषदेत आघाडीचीच सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नंदूरबारमध्ये आघाडी होते की भाजप सत्ता मिळवण्यात सरस ठरते याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आहे.