अयोध्येत दीपोत्सवात विश्वविक्रम झाला आहे. येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयूच्या तीरावर एकाच वेळी 15 लाख 76 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत दिवाळी उत्सवाचा एक भाग म्हणून रविवारी येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी पंतप्रधानांचे स्वागत आणि सत्कार केला.
अयोध्येला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामजन्मभूमीवर सर्वांसमोर रामलल्लाची पूजा केली.राम मंदिराच्या उभारणीसाठी 5 ऑगस्ट 2020 रोजी ‘भूमीपूजन’ झाल्यानंतर पंतप्रधानांची ही पहिलीच अयोध्येला भेट आहे. दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचल्यानंतर लगेचच पंतप्रधान राम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी राम लल्लाची पूजा केली. अयोध्येला पोहोचल्यावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.यावेळी पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, ‘श्री रामाचे तत्वज्ञान अयोध्येच्या प्रत्येक कणात सामावलेले आहे. आज अयोध्येतील रामलल्ला, शरयू आरती, दीपोत्सव आणि रामायण यावर संशोधन करून हे तत्त्वज्ञान जगभर प्रसारित केले जात आहे.