इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्सवर झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५१ धावांनी मात केली.एकवेळ इंग्लंडच्या दिशेने झुकलेल्या आणि नंतर अनिर्णित होणार असे वाटणाऱ्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने अखेरच्या दिवशी जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. दरम्यान, लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने विजयाचे गुपित उलगडले आहे.
विराट कोहलीने लॉर्ड्सवरील विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले.
तसेच मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या डावात नवव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीने भारतीय संघासाठी विजयाची वातावरणनिर्मिती केली, असे सांगितले. मोहम्मद शमी ७० चेंडूत नाबाद ५६ धावा आणि जसप्रीत बुमराह ६४ चेंडूत नाबाद ३४ धावा यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या अभेद्य ८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने २७१ धावांची भागीदारी करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर इंग्लंडला १२० धावांत गुंडाळत भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला.
सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरून पहिले तीन दिवस गोलंदाजांना मदत मिळाली नाही. मात्र आम्ही आखलेली रणनीती योग्य पद्धतीने लागू केली. दुसऱ्या डावात शमी आणि बुमराह यांनी ज्याप्रकारे दाबावाच्या परिस्थिती फलंदाजी केली ती अतुलनीय होती. इथूनच वातावरणनिर्मिती झाली. त्यामुळे आम्हाला पुढे मदत मिळाली. तळाच्या फलंदाजांना अशी भागीदारी करण्याची संधी क्वचितच मिळते. मात्र जेव्हा जेव्हा आम्हाला यश मिळाले आहे तेव्हा तेव्हा आमच्या तळाच्या फलंदाजांनी योगदान दिले आहे.
६० षटकांमध्ये २७२ धावा जमवणे कठीण असेल. मात्र १० बळी टिपणे शक्य आहे, असा आमचा अंदाज होता. त्याचदरम्यान, मैदानावर असलेल्या थोड्या तणावाने आम्हाला प्रेरित केले. आम्ही शमी आणि बुमराहचा उत्साह वाढवू इच्छित होतो. त्यामुळेच आम्ही नवा चेंडू त्यांच्या हाती सोपवला आणि त्यांनीही लगेच बळी मिळवत आपचा विश्वास सार्थ ठरवला, असेही विराट कोहली म्हणाला.