भारताची आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र सोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देईल. काही अटींची पूर्तता करणाऱ्या कर्जदारांसाठी व्याजदर 7.15 टक्क्यांपासून सुरू होईल. हा रेपोशी लिंक्ड लोन रेट असेल.
कंपनीने सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलंय की, या योजनेअंतर्गत वाहनाच्या एकूण किमतीच्या 90 टक्के कर्ज दिले जाईल. या योजनेनुसार नोकरदार कर्मचारी , स्वयंरोजगार करणारे उद्योजक, व्यावसायिक व्यापारी आणि कृषी व्यवसायाशीसंबंधित व्यक्तींना या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाईल. तसंच कॉर्पोरेट ग्राहकांना वाहनाच्या एकूण किमतीच्या 80 टक्के कर्ज दिलं जाईल. टाटा मोटर्सचे राजन अंबा म्हणाले कोरोना विषाणू महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या झालेल्या परिणामातून बाहेर येण्यासाठी आम्ही सामान्य जनतेला स्वतंत्र वाहनाने प्रवास करण्याची सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
आमच्या ग्राहकांना कार स्वस्त कशी पडेल याचा विचार आम्ही करत आहोत. या कठीण काळात आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रशी करार करून टाटा कंपनीची कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक विशेष कर्ज योजना सुरू करत आहोत
टाटा मोटर्सचे अंबा असंही म्हणाले की, आम्हाला आशा आहे की यामुळे ग्राहकांना सहज कर्ज मिळेल. तर बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत तमता म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, हा करार ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा देऊ शकू.
टाटा ग्रुपशी निगडित असलेल्या कंपन्या सतत ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण ऑफर घेऊन येत असतात. अडचणीच्या काळात ग्राहकांसोबतच बाकी नागरिकांना सुद्धा मदत करतात. संकटकाळी त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या मदतीमुळे त्यांनी करोडो भारतीयांच्या मनात घर केलं आहे. त्यांनी आता अल्प व्याजदराची आणलेली ही ऑफर सुद्धा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार आहे. कार घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना 90 टक्के कर्ज मिळालं तर त्यांना आनंदच होईल. तुम्हीही तसा विचार करत असाल तर लगेच बँक ऑफ महाराष्ट्रशी संपर्क साधू शकता.