जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे पाषाणात कोरण्यात आलेल्या श्री ऋषभदेवाच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या भगवान ऋषभदेवांच्या जयजयकारात बुधवारी (१५ जून) महामस्तकाभिषेक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता ऋषभदेवपुरम येथून मुख्य यजमान व प्रथम कलशकर्ता यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. मूर्ती स्थापन केल्या पासून सहा वर्षांनी प्रथमच महामस्तकाभिषेक पर्वणी होत असल्याने परिसराला जणू कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पीठाधिश रवींद्रकीर्ती स्वामीजींनी अर्घ्य समर्पण केले. गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजींनी प्रास्ताविकात शुभारंभानिमित्त आशीर्वाद दिले. शोभायात्रेत सुरुवातीला लेझीमनृत्य तसेच दिव्यघोष करून वातावरणात पावित्र्य निर्माण झाले.
कळवण तालुक्यातील मांगीतुंगीची रुषभदेवाची मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती मानली जाते. समुद्रसपाटीपासून जवळपास २५०० फूट उंचीवर डोंगरात अखंड पाषाणात हि मूर्ती निर्माण करण्यात आली आहे. सलग वीस वर्ष या मूर्तीचे काम सुरू होते. २०१६ साली मूर्ती पूर्णपणे तयार झाल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सव करण्यात आला होता. या मूर्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तत्कालीन शासनाने हा महोत्सव शासकीय महोत्सव म्हणून साजरा केला होता.
दर सहा वर्ष्यानी होणारा महोत्सव १५ जून पासून सुरु झाला आहे. बुधवारी भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक उत्सवाचे ध्वजारोहणानंतर पोलीस बँडने सलामी दिली. त्यांनतर मंगलाचरण सादर करून मंगलमय वातावरणात प्रथम द्वितीय कलशाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनतर भक्तिमय ऋषभदेव काव्यपाठ सादर करण्यात आले. सोहळ्यासाठी दिवसभर लांबलांबून भाविकांची वर्दळ सुरू होती. गर्भकल्याणक दिनी संपूर्ण पंचामृत अभिषेक केला जाणार आहे. मुंबई, इंदोर, सूरत, औरंगाबाद व देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असल्याने भाविकांसाठी निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.