निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहातो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणुने दाखवून दिले आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकास कामे करतांना निसर्गाची काळजी कशी घेता येईल, निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल हे सांगणारी आणि यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी संस्था स्थापन करा, अशी सूचना दिली. विशेष म्हणजे या संस्थेचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. माझ्या मते संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललो आहोत. त्यामुळेच जंगलाचा ऱ्हास करून विकास कामांचे प्रस्ताव जेंव्हा आपल्यासमोर येतात तेंव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असं नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असे ते म्हणाले.
मानव वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचे पाहिले आहे का, त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून पाडून तिथे राहण्यास सुरुवात केली असं ऐकलं आहे का, नाही, पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसते.
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असेही ते म्हणाले.
जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे ते याक्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.