श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी तिचा प्रियकर आफताब पूनावालाची गुरुवारी नवी दिल्लीतील जैवविज्ञान प्रयोगशाळेत ‘पॉलीग्राफ’ चाचणी करण्यात आली. सुमारे आठ तास ही चाचणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र काही माहिती अपूर्ण आल्याने शुक्रवारी पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आफताबच्या नवी दिल्लीतील सदनिकेतून पोलिसांनी पाच चाकू जप्त केले असून हे चाकू हत्येसाठी वापरण्यात आले की नाही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
एफएसएल रोहिणी येथे दुपारी १२ वाजता पूनावालाची ‘पॉलीग्राफ’ चाचणी सुरू झाली. त्याला ४० प्रश्न विचारण्यात आल्याचे जैवविज्ञान प्रयोगशाळेच्या संचालिका दीपा वर्मा यांनी सांगितले. पूनावाला यांनी चाचणीदरम्यान सहकार्य केले. परंतु काही रेकॉर्डिग स्पष्ट झाले नाही, कारण त्याला सातत्याने शिंका येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिंक येत आहे. पूनावाला याला ताप आणि सर्दी असल्याने बुधवारी चाचणी झाली नव्हती.
या चाचणीत पूनावालाला या प्रकरणाचा तपशील विचारण्यात आला. श्रद्धाला मारण्यासाठी तो कशामुळे प्रवृत्त झाला, हा नियोजित कट होता की न्यायालयात दावा केल्याप्रमाणे रागाच्या भरात हे कृत्य केले या प्रश्नासह घडलेल्या सर्व क्रम आणि मृतदेहाची विल्हेवाट कशा प्रकारे लावली याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले. तिच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यासाठी त्याने कोणत्या शस्त्राचा वापर केला होता, ज्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास होऊ शकेल याबाबत माहिती विचारण्यात आल्याचे समजते. पूनावालाने श्रद्धाचा मृतदेह कापण्यासाठी कथितपणे वापरलेली करवत अद्याप सापडलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पूनावालाच्या सदनिकेत सापडलेले चाकू जैवविज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाकूंचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आला होता का, जैवविज्ञान तपासणीनंतरच कळेल, ज्यात वेळ लागेल, असे पोलिसांनी सांगितले