गोवर साथीमुळे राज्यात आतापर्यंत १२ बालके दगावली आहेत. याकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसते. सरकारने याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. अजून किती बालके गोवरने दगावण्याची वाट सरकार पाहणार आहे, असा सवाल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केला.
राज्यातील गोवर साथीच्या संदर्भात बोलताना टोपे म्हणाले,की कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकारने या संदर्भातील उपाययोजना तातडीने करायला पाहिजेत. ज्या भागात शारीरिकदृष्टय़ा कमकुवत मुलांचे प्रमाण अधिक आहे त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने त्यांना करोनाची लागण झाली तर उपचाराच्या संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात.
गोवर साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण, उपचार आणि जनजागृती या तीन पातळय़ांवर झाले पाहिजेत. गोवरमुळे १२ बालके दगावणे ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. नऊ महिने आणि त्यानंतर १५ महिने झाल्यावर प्रतिबंधक लस तसेच त्यानंतर पाच वर्षांच्या वयापर्यंत जीवनसत्त्वाच्या गोळय़ा बालकांना द्याव्या लागतात. मुंबई, नाशिक, मालेगाव आणि औरंगाबाद येथे गोवराची लागण झालेली बालके आढळली. ही बाब राज्य सरकारने गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे. संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. यासाठी मोठी मोहीम आरोग्य विभागाने घेण्याची आवश्यकता आहे. मागील दोन-अडीच वर्षांत ज्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस देण्याचे काही कारणांमुळे राहून गेले असेल, त्यांचा शोध घेऊन लसीकरण केले पाहिजे, असेही टोपे म्हणाले.