गेल्या काही वर्षांत नेतृत्व आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे दडपण वाढल्याने विराट कोहलीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले.
‘‘कोहली हा मैदानावर अतिशय आक्रमक आणि मैदानाबाहेर विनम्र स्वभावाचा व्यक्ती आहे. कर्णधार म्हणूनही त्याने भारताला उत्तम यश मिळवून दिले आहे. परंतु तो सध्या धावांसाठी झगडत असल्यामुळे त्याच्याविषयी अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पण तो भारताचा क्रिकेटदूत आहे. गेल्या एक-दोन वर्षांतील त्याची कामगिरी नक्कीच चिंताजनक आहे. परंतु दडपणामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला असेल,’’ असे हॉगने सांगितले. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. ऑस्ट्रेलियाने तसे घेतले आहेत,’’ असे तो म्हणाला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया पर्यटन मंडळातर्फे आयोजित केलेल्या प्रचार कार्यक्रमात हॉगने पर्थमधील स्टेडियम व भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याविषयी अंदाज व्यक्त केले.