राज्यात निर्बंध अधिक कडक होणार : विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली.

राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

परप्रांतिय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेऊन खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. आम्ही अजून एक दिवस जनतेला विनंती करतो अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का ? याबाबतही सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.