नाशिकमध्ये मुली पळवून नेणारी टोळी जेरबंद, पोलिसांच्या कारवाईने पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’

नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना समोर येत आहेत. जिल्ह्यात लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या सहकार्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या पथकांनी त्यांना अटक केली आहे. ओझर मध्ये 2 महिन्यात 2 मुलींचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ओझरमधीलच एक महिला पैशांसाठी हे काम करत असल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान त्या महिलेकडून अपहरण करतानाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केल्याने कौतुक होत आहे. 4 आरोपींना ताब्यात घेण्यात  नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांना यश आले. यामध्ये 2 महिला आरोपी आहेत तर 2 पुरुष आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांनी याला ऑपरेशन मुस्कान म्हणून नाव दिले होते. यामध्ये अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ज्या मुलींचे अपहरण करण्यात आले होते यामध्ये दहा ते बारा वयोगटातील मुलींचा समावेश होता त्यामुळे पालकामध्ये भितीचे वातावरण होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.