एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे लाटल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. राज्यभरात त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे लाटणाऱ्या सदावर्तेंची पोलिसांच्या मार्फत तीर्थयात्रा सुरू झाली आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यभरात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अकोल्यात गुन्हे दाखल झाले आहे. मध्यतंरी सदावर्तेंच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि वाहन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी सडकून टीका केली.
‘एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून गुणरत्न सदावर्ते यांनी 144 कोटीची माया जमवली, या पैशातून कोट्यवधीची मालमत्ता त्यांनी खरेदी केली, एसटी कर्मचाऱ्यांनी घामाचा पैसा जमवला होता, हा पैसा त्यांनी सदावर्ते यांच्याकडे दिला, सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका खडसेंनी केली.
तसंच, ;आता जे सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून सदावर्ते यांची तीर्थयात्रा सुरू झाली आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांची महाराष्ट्र भ्रमंती सुरूच आहे. कोल्हापूरमध्ये सदावर्तेंवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सदावर्ते यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,. सोमवारपर्यंत सदावर्ते कोठडीत राहणार आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे व उदयनराजे यांच्याबदल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल केला आहे.