3 वर्षांची परी इतर लहान मुलांसोबत खेळत होती. खेळता खेळता ती एका मुलावर थुंकली. आता परी इतकी लहान त्यामुळे आईने तिला मारलं नाही पण आई तिला परी असं करायचं नाही बेटा. तू बॅड गर्ल आहेस का? असं म्हणाली.त्यानंतर इतर मुलंही तिला बॅड गर्ल बॅड गर्ल म्हणून चिडवू लागले. बॅड गर्ल म्हणजे काय याचा नेमका अर्थ परीच्या वयाच्या मानाने तिला नक्कीच माहिती नाही. पण सर्वजण आपल्याला चिडवत आहेत, यामुळे बॅड गर्ल म्हणताच ती रडू लागते. आईही आपल्याला बॅड गर्ल म्हणते आहे. याचं तिला वाईट वाटत.
लहान मुलांना चांगलं काय, वाईट काय हे समजवण्याच्या नादात आपण त्यांना बॅड गर्ल किंवा बॅड बॉय म्हणतो. म्हणजे तू अमूक एखादी गोष्ट केलीस तर तू बॅड, तमूक गोष्ट केलीस तर तू गूड, अशी शिकवण त्यांना देतो. पण ज्या मुलांना आपण एरवी देवाघरची फुलं म्हणतो ती खरंच बॅड असतात का?, त्यांना असं बॅड म्हणणं योग्य आहे का?
पालकत्व तज्ज्ञ डॉ. इशिना सादना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, “तुम्ही पालक म्हणून असं कसं करू शकता, तुम्ही बॅड पॅरेंट आहात, असं तुम्हाला कुणी म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल. फक्त एका चुकीमुळे तुम्ही वाईट पालक होतात का? नाही ना. मग विचार करा तुमच्या मुलांना बॅड म्हटलं तर कसं वाटत असेल. त्यामुळे मुलांना वाईट म्हणणं सोडा”
डॉ. सादना पुढे म्हणाल्या, “मुलं वाईट नसतात. ते ज्या काही गोष्टी करतात त्या वाईट असू शकतात, चुकीच्या असू शकतात. कारण त्यांचा मेंदू विकसनशील आहे, ती शिकत आहेत आणि तेसुद्धा एक माणूस आहेत, माणसांकडून चुका होतातच. त्यामुळे त्यांच्या एका चुकीसाठी त्यांनाच वाईट ठरवू नका”
“आपण त्यांना बॅड म्हटलं तर त्यांचाही मेंदूही ते स्वीकारतो. आपण बॅडच आहोत असं त्यांना वाटतं. आपल्याला नक्कीच ते नको आहे. त्यामुळे ते किती चांगले आहेत हे त्यांना दाखवून द्या. ते तसेच होतील”, असा सल्ला डॉ. सादना यांनी दिला आहे.