राज्यातील महत्त्वाच्या पदावरील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आले. मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मीरा भाईंदर या शहरातील अधिकऱ्यांचा यात समावेश आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यापासून विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबेपर्यंत सर्वांच्या विविध ठिकाणी बदल्या झाल्या आहेत.
मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.
नाशिक पोलीस आयुक्तांची बदली झाली. नाशिक पोलीस आयुक्तपदी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची वर्णी लागली आहे. तर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी येणार आहेत. अंकुश शिंदे यांनी यापूर्वी देखील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. नाशिक शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जयंत नाईकनवरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 24 तासांपूर्वीच भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. सुनील फुलारी यांनी नाशिक शहरात यापूर्वी पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बदलले
विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा सुव्यवस्था पदावर असलेले मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसापासून नवी मुंबई पोलीस बिपीन कुमार सिंह यांची बदली होणार आहे, अशी चर्चा असताना अखेर आज शासन निर्णय आला. बिपीन कुमार यांच्या जागी आता नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रे मिलिंद भारंबे यांच्या हाती येणार आहेत.
अमरावतीच्या आयुक्त डॉ. आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये बदली
अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी आता नविनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त असतील. अमरावतीत डॉ. आरती सिंह यांची कारकीर्द गाजली. आरती सिंह यांची बदली करण्यात यावी यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत तक्रारही केली होती.