मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जेनिलिया देशमुख पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘वेड’ हा नवा कोरा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या टीझरनंतर सिनेमाप्रती असलेली उत्सुकता चांगली वाढली होती. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जेनिलिया, रितेशबरोबरच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, साऊथ अभिनेत्री जिया शंकर प्रमुख भूमिकेत आहेत. टीझर आणि ट्रेलरला पसंती मिळत असताना दुसरीकडे मात्र रितेश जेनिलियाचं वेड ओरिजनल नसल्याच्या चर्चा होत आहेत. वेड हा सिनेमा साऊथ सिनेमाचा मराठी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चा नेमक्या का होत आहेत? यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घ्या.
अभिनेत्री जेनिलिया वेड या सिनेमाची निर्माती आहे तर अभिनेता रितेश देशमुखनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दोघेही पहिल्यांच निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे जेनिलिया देशमुख पहिल्यांदाच वेड सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून जेनिलियाचं अस्खलित मराठी ऐकायला मिळत आहे.
वेड सिनेमाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत. मात्र सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरमधून वेड हा सिनेमा साऊथ सिनेमा ‘मजिली’चा मराठी रिमेक असल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना कारण ठरलं आहे ते म्हणजे टीझर आणि ट्रेलरमधील काही सीन्स. जे सीन्स मजिली या सिनेमाची तंतोतंत मिळते जुळते आहेत.
वेड सिनेमाच्या टीझरच्या शेवटी जेनिलिया छत्री घेऊन उभी आणि रितेश तिच्यासमोर सिगरेट पेटवताना दिसत आहे. हाच सीन मजिली सिनेमातही आहे. तसंच दोन्ही सीन्समधील कलाकारांचे कॉस्ट्युम्सही सारखे आहेत. मजिली आणि वेड सिनेमातील हे दोन सारखे सीन्स एकत्र करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत. यावरून वेड हा मजिली या साऊथ सिनेमाचा मराठी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. पण रितेश आणि जेनिलिया यांच्याकडून मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मजिली हा साऊथ इंडियन सिनेमा 2019मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी असलेले नागा चैतन्य आणि समांथा रूथ प्रभू प्रमुख भूमिकेत आहेत. दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.