भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात आज (13 जानेवारी) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. नागपूरच्या 20 वर्षीय मालविका बनसोडने ऑल्मिपिक मेडल विजेत्या सायना नेहवालवर शानदार विजय मिळवला. या विजयासह मालविकाने ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्याचं दिल्लीतील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.
महिला एकेरीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मालविकाने सायनाचा सलग 2 सेटमध्ये 21-17 आणि 21-9 ने पराभव केला. हा सामना एकूण 34 मिनिट चालला. वर्ल्ड रँकिगमध्ये सायना 25 व्या क्रमांकावर आहे.
सायना आणि मालविका या दोघांमध्ये पहिल्या सेटच्या सुरुवातीला बरोबरी पाहायला मिळाली. दोघांचे पॉइंट्स 4-4 इतके होते. मात्र यानंतर मालविकाने गियर चेंज केला. दुसऱ्या सेटमध्येही दोघेही 2-2 ने बरोबरीवर होत्या. मात्र मालविकाने आघाडी घेत या सेटसह सामना जिंकला.
मालविका ही महाराष्ट्रातील एक उगवती स्टार बॅडमिंटनपटू आहे. मालविकाने 13 आणि 17 वर्षांखालील राज्य स्तरावरच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच मालविकाची 2018 मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मालविकाने 2018 मध्ये काठमांडूत झालेल्या दक्षिण आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत विजय मिळवला होता.
त्यानंतर 2019 मध्ये मालविकाने इंडिया सीनिअर रँकिंग स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली होती. मालविकाने 2019 मध्ये मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सीरीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं.