ओमिक्रॉनने देशात पुन्हा दहशतीचं वातावरण परवले असताना, ख्रिसमसच्या तोंडावर आता गोव्याच्या चिंतेतही भर पडली आहे. सर्वात जास्त परदेशी पर्यटक गोव्यात दाखल होतात. त्यामुळे ओमिक्रॉनचा सर्वात मोठा धोका हा गोव्याला आहे. त्यात ख्रिसमसच्या तोंडवर गोव्याला ओमिक्रॉनने दस्तक दिल्यानं गोव्यातील व्यवसायिकांनाही धडकी भरली आहे. कारण व्यापाऱ्यांना ख्रिसमसच्या सणाला मोठ्या नफ्याची अपेक्षा असते आणि नेमके याचवेळी ओमिक्रॉनने दस्तक दिल्याने चिंतेचं वातावरण आहे.
गोवा राज्यात ओमिक्रॉनने एन्ट्री केल्याची शक्यता आता बळावली आहे. कारण ओमिक्रॉनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. रशियामधून आलेला प्रवाशांचा ग्रुप कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे इतर अहवाल येणे अजून बाकी आहे. त्यामुळे तुर्तास ठाम माहिती समोर आली नसली तरी गोव्यात ओमिक्रॉनचे काही रुग्ण आढळून येण्याच शक्यता बळावली आहे. संशयित प्रवासी सध्या विलगीकरण कक्षात आहेत.
ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे गोवा सरकारची चिंता वाढली आहे. कारण ओमिक्रोन आढळल्यास गोव्याच्या आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शक्यतो. गोव्याला जास्तीत जास्त महसूल हा पर्यटन व्यवसायामुळे मिळतो. आणि ओमिक्रॉनचा निश्चितच पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचंं मोठं नुकसान होऊ शकते. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे त्याचा हॉटेल व्यवसायापासून इतर अनेक व्यवसायांना मोठा फायदा होतो. आतापर्यंत ओमिक्रॉनने जवळपास 40 पेक्षा जास्त देशात एन्ट्री केली आहे. त्याचबरोबर भारतातील ओमिक्रॉन आढळलेली राज्यही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.