आज दि.१९ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

नगरपंचायतींचे निकाल :
भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा
राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती, ३८७ जागा

इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरंपतायची आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.

चुरशीच्या बोदवड नगरपंचायत
निवडणुकीत शिवसेनेची मुसंडी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या. तर भाजपाला तर अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

दिवंगत आर. आर. पाटील यांचे
चिरंजीव रोहित पाटील विजय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं असून रोहित पाटील यांचा विजय झाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या. दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६, एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

राज्यातली एकूण परिस्थिती
नियंत्रणात : राजेश टोपे

राज्यातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आता कमी होत चालल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. एएनआयशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे आणि राज्यातली एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणं आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं यासाठी शासन पूर्ण क्षमतेनं काम करत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी
उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होत नाहीत, ज्यांना DGCA ने मंजूरी दिली आहे आणि ज्या देशांसोबत भारताने एअर बबल व्यवस्था केली आहे अशा देशांतील उड्डाणे, सुरू राहतील. यापूर्वी, डीजीसीएने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंदी वाढवली होती.

नीट यूजी काउंसलिंगसाठी
नोंदणी प्रक्रिया सुरु

मेडिकल काउंसलिंग कमेटी म्हणजेच एमसीसीने आज १९ जानेवारीपासून नीट यूजी काउंसलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. जे काउंसलिंग राऊंडसाठी अर्ज करू इच्छितात ते अधिकृत संकेतस्थळ mcc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पर्याय निवडण्यासाठीची लिंक २० जानेवारीला सक्रिय होईल आणि २४ जानेवारीला ती निष्क्रिय केली जाईल. अर्ज केलेल्या उमेदवारांची २५ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत संबंधित विद्यापीठ/संस्थांकडून पडताळणी केली जाईल. २७ जानेवारी ते २८ जानेवारी जागा वाटप. २९ जानेवारीला निकाल जाहीर केला जाईल आणि ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत अहवाल दिला जाईल.

ब्रिटनमधील बंगला खाली करण्याचे
विजय मल्ल्याला न्यायालयाचे आदेश

भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे आता लंडनमधील आलिशान घरही त्याच्या हातातून गेले आहे. स्विस बँक यूबीएससोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात ब्रिटीश न्यायालयाने मल्ल्याचा अर्ज फेटाळला आहे. हे घर खाली करण्याचा आदेश काढण्यात आला होता. या आदेशावर स्थगिती आणण्यात यावी, अशी मागणी मल्ल्याने केली होती. परंदू ब्रिटिश न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मल्ल्या लंडनमधील त्याच्या आलिशान घरासाठी कायदेशीर लढाई हरला आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाने
केली निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. मिर्झा आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हेनियन संघाकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे.

सचिन तेंडुलकरचा विक्रम
मोडण्याची विराट कोहलीला संधी

विराट कोहलीला परदेशांतील एकदिवसीय सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी अवघ्या नऊ धावांची गरज आहे. सध्या विराटने परदेशी मैदानांवर खेळताना एकूण पाच हजार ५७ धावा केल्यात. या यादीमध्ये विराटच्या पुढे केवळ एका खेळाडूचं नाव असून तो खेळाडू आहे, सचिन तेंडुलकर. सचिनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीमध्ये एकूण पाच हजार ६५ परदेशी मैदानांवर केल्यात. म्हणजेच विराटने आणखीन नऊ धावा आपल्या खात्यात जमा केल्यास तो सचिनच्या ५ हजार ६५ धावांचा हा विक्रम आपल्या नावे करु शकतो.

राज्यात 39 हजार नवे कोरोनाग्रस्त
आढळले, 53 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. महाराष्ट्रात अजूनही रोज 40 हजार आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात 39207 नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर एकूण 53 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 12810 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

INS रणवीर युद्धनौकेत
मोठा स्फोट, तीन जवान शहीद

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या (INS Ranveer Blast) युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

भारत बनली 5 वर्षांत जगातील
तिसरी मोठी स्टार्टअप बाजारपेठ

मोदी सरकारच्या काळात भारतीय उदयोन्मुख उद्योगांनी काळाची गती ओळखून आघाडी घेतली आहे. केवळ 5 वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप बाजारपेठ बनली आहे. 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या स्टार्टअप्सच्या यादीत तिसऱ्या स्थानी भारताने झेंडा रोवला आहे. जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने भारत मार्गक्रमण करत आहे. एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवली मूल्य असणाऱ्या नव्या दमाच्या उद्योगांमध्ये भारताने जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. या स्पर्धेत अमेरिका आघाडीवर आहे तर चीन दुसऱ्या स्थानी आहे. भारतात स्टार्टअप उद्योगाला चालना मिळाल्यापासून 90 युनिकॉर्न भारताची आघाडी सांभाळत आहेत.

( गुगल साभार छायाचित्र )

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.