पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. यात अनेक मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे काही मंत्र्यांना आपला राजीनामाही द्यायला लागला. राजीनामा द्यावा लागलेल्यांमध्ये रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या या भाजप नेत्याचं पुढे काय होणार? त्यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपचं नेतृत्व यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मंत्रिमंडळातील मोठ्या फेरबदलानंतर आता भारतीय जनता पक्षात (BJP) संघटनात्मक पातळीवर मोठे फेरफार होताना दिसत आहेत. पक्षाचे 3 पदाधिकारी आणि एक प्रवक्त्याचा मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यानंत लवकरच या जागांवर नेमणूक होऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णा देवी, राष्ट्रीय सचिव विशेश्वर टुडु आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव चंद्रशेखर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यानंतर त्यांच्या पदावरील रिक्त जागा भरण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना 7 जुलैला संबंधित नेत्यांनी आपल्या सेवेची गरज पक्षाला आहे आणि पक्षासाठी आपला अनुभव वापरणार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि डॉ हर्षवर्धन या सारख्या नेत्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल.
भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काही वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा उपयोग पुढील 3-4 महिन्यात होणाऱ्या राज्यपाल नियुक्तीतही केला जाणार आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये जवळपास 6 राज्यपाल निवृत्त होत आहेत. या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती होईल. यात या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल.
भाजपच्या संसदीय बोर्डात मागील मोठ्या काळापासून 4 पदं रिक्त होते. सुषमा स्वराज, अनंत कुमार ,अरुण जेटली यांच्या निधनामुळे 3 पदं रिक्त होती. याशिवाय व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानं त्यांची एक जागा आणि आता थावरचंद गेहलोत यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानं त्यांची एक जागा अशा एकूण 5 जागा रिक्त आहेत.