बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने मोठा विक्रम नोंदवला. याबाबतीत त्याने पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा विक्रम मोडला. दिल्ली कसोटीत जडेजाने विकेट घेताच कसोटीत 250 बळींचा टप्पा गाठला.
अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा कसोटीत सर्वात वेगवान 2500 धावा आणि 250 विकेट घेणारा आशियाई क्रिकेटर ठरला आहे. त्याने यामध्ये पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज इम्रान खान यांना मागे टाकलं. जडेजाने 62 डावात 2500 पेक्षा जास्त धावा आणि 250 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2500 धावा आणि 250 विकेट घेण्याचा विक्रम इयान बॉथमच्या नावावर आहे. बॉथमने जगात सर्वात कमी 55 डावात 2500 धावा आणि 250 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता दुसरा क्रमांक रविंद्र जडेजाचा लागतो. त्याच्यानंतर इम्रान खान हे तिसऱ्या स्थानी आहेत. तर कपिल देव हे चौथ्या क्रमांकावर आहेत.
रविंद्र जडेजाच्या आधी भारताकडून कपिल देव, अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटीत 2500 धावा आणि 250 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दिल्ली कसोटीत एक खास विक्रम नावावर नोंदवला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 कसोटी विकेट घेण्याची कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे.