नव्या वर्षातला हा नवा संकल्प.
रंग जीवनाचे…!
आपण सर्वांचे जीवन विविध रंगांनी भरलेले असल्याने त्यात खरी रंगत आहे. या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, वेदना आहे, आनंद आणि लढण्याची जिद्द सुद्धा आहे. लढण्याचे बळ देणारी कोणतीतरी अदृश्य शक्ती जगामध्ये वावरतेय. त्यामुळेच खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. जेव्हा जेव्हा स्वतःचे सामर्थ्य कळू लागते तेव्हा तेव्हा परिस्थितीला झुकावे लागते. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असे अनेक प्रसंग आपण वाचलेले आहेत. आज देखील आपल्या अवतीभवती असे अनेक व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्या कर्तुत्वाने कठीण प्रसंग देखील सुकर झाले आहेत.
माऊली पायी वारी जळगावच्या निमित्ताने जळगाव ते शेगाव 27 ते 31 डिसेंबर अशी वारी घडली. या वारी तील अनुभव, सेवा, समर्पण आणि परमार्थाची अनुभूती हा लिहिण्याचा आणखी वेगळा विषय आहे. मात्र वारीच्या निमित्ताने जेव्हा आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या गावी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झालेली होती. बोचरी थंडी सर्वत्र पसरलेली असताना आमची वारी चालली होती.
रस्त्याच्या कडेला एका चंद्रमौळी झोपडीच्या अंगणामध्ये खाटेवर फाटके स्वेटर घालून सावित्रीच्या दोन लेकी रस्त्यावर लागलेल्या पथदिव्यांच्या प्रकाशामध्ये अभ्यास करत होत्या. त्यांची झोपडी अंधारामध्ये पूर्णपणे बुडालेली आपण छायाचित्रात पाहू शकतो. दिवाळीमध्ये आपण घराच्या बाहेर पणत्या लावतो, ते मांगल्याचे आणि प्रकाश पर्वाचे प्रतीक म्हणून. अंधारात बुडालेल्या झोपडीबाहेर पथ दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या या मुली म्हणजे स्वयंप्रकाशित आणि अंधाराला भेदणाऱ्या दिवाळीतल्या पणत्याच. त्यांचे नाव गाव शिक्षण ही सर्व तांत्रिक माहिती आपल्याकडे असतांना इथे देण्याचे काही कारण वाटत नाही. इथे फक्त इतकेच महत्त्वाचे समजून घ्यायला हवे, कोणत्याही परिस्थितीला शरण न जाता मार्ग काढणे महत्त्वाचे असते. कठीण परिस्थिती ही येणारच आहे, कारण जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याचे सामर्थ्य बाहेर कुठे विकत मिळत नाही, ते आपल्या अंतरंगातच दडलेले असते. फक्त ओळखता आले पाहिजे.
आज पासून अनेक वर्षांपूर्वी देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. अनेक वर्षांच्या प्रवासानंतर आपण येथवर पोहोचलेलो आहोत. तरीसुद्धा आपल्याच आजूबाजूला राहणाऱ्यांची दुःख आपण जाणून घेऊ शकत नाही. वर छायाचित्रात दिसणाऱ्या मुलींच्या झोपडीच्या अगदी आजूबाजूला लख्ख प्रकाशात उजळणारी अनेक घरं आहेत. पण कोणालाही या झोपडीत थोडा प्रकाश द्यावा असे वाटले नसेल का?
मला या मुलींचे खरोखरच मनापासून कौतुक वाटते, ते यासाठी अगदी लहान वयात सुद्धा त्यांच्यातील समजूतदारपणा आणि लढाऊ वृत्ती ही तुमच्या आमच्यासारख्यांना जगण्याचे वेगळे बळ देणारी आहे. म्हणून या मुलींच्या लढाऊ वृत्तीला सलाम आहे. आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, या दोन्ही लेकी म्हणजे अंधाराला भेदणाऱ्या शिक्षण ‘ज्योती’च..!
- दिनेश दीक्षित जळगाव.