कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर वक्तव्य केल्याने मागच्या काही दिवसांपासून सीमावादावर जोरदार वादावादी सुरू आहे. जत तालुक्यातील 40 गावे तसेच सोलापूर आणि अक्कलकोट ही शहरही कर्नाटकचा भाग असल्याचे मुक्ताफळे मुख्यमंत्री बोम्मई यांनी उधळली होती. यानंतर त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. काल कर्नाटकमधील हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. यावरून नवा वाद पेटला आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासत रोखण्याचा प्रयत्न केला.
काल(दि.06) कर्नाटकच्या हिरेबागेवाडी येथे कन्नड वेदिकेच्या लोकांनी महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. यानंतर काहींना मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी थेट इशारा दिला आहे. यावरून कालपासून जोरदार वादंग सुरू झाला आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासत रोखण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (दि. 07) पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटक सरकारच्या विरोधात औरंगाबादमध्ये ठाकरे गटाची युवासेना जोरदार आक्रमक झाल्याने दिवसभर तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
युवासैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांवर जय महाराष्ट्र लिहत कर्नाटकच्या नावावर काळे फासण्यात आले. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही शिवसैनिकांनी दिली. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास औरंगाबादमधून कर्नाटक बस सुटतात यावेळी युवासेनेचे लोक एकत्र येत बसेसना काळे फासले.
मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीने बैठक
कर्नाट आणि महाराष्ट्र यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सध्या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात कर्नाटकातील अनेक सरकारी बसेसना काळे फासले. खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेनेही कन्नडिगांविरोधात आंदोलन केलं.
या सीमावादावरून दोन्ही राज्यांमधील वाद वाढल्याने राजकारणही तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्यातील बसेसला लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. दुसरीकडे, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली.