राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. नाशिक, मनमाड, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलन तीव्र झाल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेणार का, हे पाहावे लागेल.
नाशिकमधील विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे. नाशिकच्या एन. डी. पटेल रोडवरील एस. टी. डेपोत या कर्मचाऱ्यांनी एकत्र जमले होते. त्यांनी महागाई भत्ता देण्यात यावा, वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. दिवाळीपूर्वी वेतन मिळावे अशी मागणी यावेळी केली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संप करू, असा इशारा इंटकचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. दरम्यान, मनमाडमध्येही कामगारांनी बंद पुकारून उपोषण केले. आंदोलनामुळे स्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
पुणे आणि कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पुण्यात स्वारगेट परिसरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नागपूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या काळात एसटी वाहतूक सुरू राहील. प्रवाशांना वेठीस धरणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सोलापूरमध्ये श्रमिक कृती संघटनेने उपोषण सुरू केले आहे. मात्र, या ठिकाणीही एसटीची वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. आंदोलनात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करू, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
समितीच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे तीन टप्प्यात आंदोलन करण्याच निश्चित करण्यात आले आहे. दिवाळी तोंडावर 27 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू करण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.