संचारबंदीच्या काळात काय बंद असणार, कोणत्या सेवा सुरू राहणार, कोणासाठी असणार याबाबत उत्सुकता आहे.. त्यानुसार संचारबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ”आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, लोकल बस सुरू राहतील, पण त्या अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्याजाण्यासाठी सुरू राहील,” असं स्पष्ट केलं.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठीशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य
राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.