‘झुंड’ला टॅक्स फ्री कधी करणार, निर्मात्याचा प्रश्न

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकली आहेत. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची मन हेलावणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला.

मात्र यामुळे गोंधळात पडल्याची भावना ‘झुंड’ या चित्रपटाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी व्यक्त केली. द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री केला तर आमचा झुंड का नाही, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. ‘झुंड’ला केवळ प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या चित्रपटाचा विषय हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. याविषयी फेसबुकवर त्यांनी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांमध्ये द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री घोषित करण्यात आला आहे.

4 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. झुंडनंतर आठवडाभराने विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला. या चित्रपटाला केंद्र आणि राज्य सरकारकडून साथ मिळाली आणि बऱ्याच राज्यांमध्ये त्याला करमुक्त करण्यात आलं. झुंडच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचं म्हटलंय. द काश्मीर फाईल्सप्रमाणेच झुंडसुद्धा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे, असं त्या म्हणाल्या.

‘मी नुकताच द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेली काश्मिरी पंडितांची व्यथा ही हृदयद्रावक आहे. या कथेला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण झुंडची निर्माती म्हणून माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

झुंडसुद्धा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे आणि या चित्रपटातील संदेशाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं आहे की सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करण्यास निवडते, त्याला सोशल मीडियावर प्रमोट करते आणि कार्यालयांना चित्रपट दाखवण्यास किंवा त्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यास सांगून त्याचं समर्थन करते. झुंड या चित्रपटाचाही विषय आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. झुंड हा चित्रपट केवळ जात आणि आर्थिक विषमतेबद्दल बोलत नाही, तर समाजातील खालच्या स्तरातील लोकांना यशाचा मार्ग शोधण्यास प्रेरणा देतो’, असं सविता यांनी लिहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.