पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळात एक महिला मंत्र्याला देखील स्थान देण्यात आले आहे. बलजीत कौर यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये आम आदमी पार्टीचे नेते हरपाल सिंह चीमा हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आज हरपाल सिंह चीमा यांच्यासह बलजीत कौर, हरभजन सिंह ईतो, विजय सिंघला, लाल सिंह कटरौचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरज्योत सिंह बैंस या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता भगवंत मान सरकारमधील मंत्रीमंडळाचा आज शपथविधी सोहळा पार पडला.
पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारांची यादी ट्विटरवरून प्रसिद्ध केली होती. ही यादी प्रसिद्ध करताना भगवंत मान यांनी पंजाबचे नवे मंत्रिमंडळ असे कॅप्शन देखील या यादीला दिले होते. तसेच या सर्वा उमेदवारांचे मान यांनी अभिनंदन देखील केले होते. काँग्रेसला धोबीपछाड देत आप पंजाबमध्ये सत्तेत आले आहे. आपला पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र पिछेहाट झाली. विधानसभेच्या तब्बल 92 जागांवर आपने विजय मिळवला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या आठवड्यात थोर स्वातंत्र्य सेनानी भगत सिंह यांच्या मूळ गावी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी बोलताना मान यांनी म्हटले होते की, आम आदमी पार्टीचे हे सरकार सदैव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहील, पंजाबमध्ये विकासाचे एक नवे व्हिजन घेऊन आप कार्य करेल. दरम्यान आज भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.