जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज राजधानी दिल्लीत पोहोचले. केंद्रीय परराष्ट्र मंत्री अश्विनी वैष्णवर यांनी विमानतळावर किशिदा यांचं स्वागत केलं. फुमियो किशिदा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्याचबरोबर ते 14 व्या भारत-जापान वार्षिक शिखर संमेलनातही सहभागी होणार आहेत. जापानी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणूक वाढवणे आणि क्षमता विस्तारण्यावरही चर्चा होईल, अशी माहिती जापानमधील वृत्तपत्रांनी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यात जवळपास 300 अब्ज येनच्या कर्जावरही सहमती होण्याची शक्यता आहे. तसंच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य करारावर स्वाक्षरी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.
किशिदा भारतात 5 हजार अब्ज येन गुंतवणुकीची घोषणा करु शकतात, असे वृत्तही जापानी वृत्तपत्रांनी दिलंय. तसंच ही किशिदा यांची ही 5 हजार येनची गुंतवणूक ही माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2014 मध्ये घोषित केलेल्या 3 हजार 500 अब्ज येन गुंतवणूक आणि निधी व्यतिरिक्त असणार आहे, अशी माहितीही काही प्रमुख व्यावसायिक वृत्तपत्रांनी दिलीय.
जापान सध्या भारतात पायाभूत सुविधांचा विकास आणि जापानच्या शिंकनसेन बुलेट ट्रेन तंत्रज्ञानावर आधारित हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी मदत करत आहेत. पंतप्रधान किशिदा हे आर्थिक परिषदेवेळी सार्वजनिक आणि खासगी निधीची घोषणा करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जापानच्या पंतप्रधानांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर किशिदा हे भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. या शिखर संमेलनात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेत ते अधिक वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा होईल.