आज दि.१ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी
इंजेक्शनला आपातकालीन म्हणून मान्यता

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसलेला असताना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा लढा अधिकाधिक कठीण होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. करोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आलं आहे.

कोविशिल्ड या लसीचा केवळ
एकच डोस पुरेसा ठरणार

सद्यस्थितीत दोन डोसद्वारे कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी लागत आहे. मात्र, लवकरच कोविशिल्ड या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात लसीकरणासाठी मुख्य लसीची भूमिका निभावणाऱ्या कोविशिल्डच्या सिंगल डोसचा नियम आणण्याची तयारी केंद्र सरकार करीत आहे. अद्याप निर्णय झालेला नसला तरीही सरकारद्वारे तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे.

देशातील २६ राज्यांमध्ये काळ्या
बुरशीचे रुग्ण आढळले

देशात कोरोना महामारीसोबत आता काळ्या बुरशीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. देशातील २६ राज्यांमध्ये काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. काळ्या बुरशीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचे ३०,१०० व्हायल (कुप्या) वाटप केल्या आहेत. मात्र या कुप्या मागणीच्या दहा टक्के सुद्धा नसल्याचे स्पष्ट होत आहे. देशात सध्या काळ्या बुरशीच्या २० हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासाठी दररोज ३० हजार व्हॉयल आवश्यक आहेत.

२५ जुलैनंतर होणार
बारावीची परीक्षा

बारावीच्या परीक्षांच्या तारखा आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे. कारण या संदर्भातील याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने मात्र परीक्षेशी संदर्भात तयारी सुरू ठेवली आहे. २५ जुलैनंतर परीक्षा होईल, असे संकेतही मंत्रालयाने दिले आहेत.

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने
राजकीय वर्तुळात चर्चा

संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष काढला तर त्यामध्ये ते मला घेणार आहेत, या वृत्ताबद्दल मला काहीही माहिती नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांच्या या अनपेक्षित वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया काहीशा उंचावल्या आहेत.

करोना विषाणूचा
चीनमध्ये पुन्हा शिरकाव

कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेत झाल्याचा दावा अमेरिका आणि ब्रिटेनच्या संशोधकांनी केल्यानंतर चीनमध्ये हा विषाणू पुन्हा शिरकाव करत असल्याचे स्पष्ट होत आहे. चीनच्या दक्षिण प्रांतातील ग्वांगदोंग शहरात कोरोनाचा संसर्ग झाल्याने नवे रुग्ण आढळले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या शहरात प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रांताची राजधानी ग्वांगझूच्या अनेक भागात लॉकडाउन लावण्यात आला आहे.

नायजेरिया मध्ये 200
विद्यार्थ्यांचे अपहरण

दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियात मध्ये सध्या अत्यंत अनिश्चिततेचे आणि भीतीचे वातावरण आहे. कारण या ठिकाणी वारंवार अपहरणाचे प्रकार घडत आहेत. पैशाची खंडणी मागण्यासाठी अपहरणाच्या प्रकरणांवरून नायजेरियात भीतीचे वातावरण आहे. त्यातच सशस्त्र अपहरणकर्ते उत्तर नायजेरियाच्या एका शाळांमध्ये घुसले आणि त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे २०० विद्यार्थ्यांचे अपहरण केले. यात एका मुलाचा मृत्यू झाल्याचे समजते.

लहान मुलांमघ्ये
वाढतोय लठ्ठपणा

सध्या कोरोनामुळे अनेक दैनंदिन व्यवहार ठप्प असून देशभरात काही ठिकाणी अद्यापही लॉकडाऊन कायम आहे. आपल्या राज्यातही अद्याप अशीच परिस्थिती असल्यामुळे आबालवृद्ध घरातच बसून आहेत. घरात बसून ‘नेमके काय करावे? त्यामुळे सहाजिकच मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात वेळ घालवण्यात येतो. मात्र लहान मुलांमघ्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. भावी पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याने समाजशास्त्र, मानसशास्त्रज्ञ तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राम मंदिर जागेचा
आणखी विस्तार होणार

अयोध्येतील राम मंदिरासाठी ७० एकराची जागा निश्चित करण्यात आली आहे. पण, या जागेला वास्तूदोषापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नात असलेल्यांना ७० एकर जागा मंदिरासाठी प्रतिकुल असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आसपासची आणखी जागा खरेदी करण्यासाठी ट्रस्टचे प्रयत्न सुरू आहेत. राम मंदिराचे निर्माण कार्य आता वेगाने सुरू आहे. याठिकाणी पुजा-अर्चना तर सुरू आहेच, शिवाय या परिसराचे मोजमापही वास्तूदोषाच्या अनुशंगाने व्यवस्थित केले जात आहे.

काँग्रेसवर आता रणनीती
बदलण्यासाठी पक्षातूनच दबाव

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसवर आता रणनीती बदलण्यासाठी आपल्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. आगामी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत युती करावी. असे न केल्यास पक्षाच्या राजयकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्याचे पक्षांच्या नेत्यांचे मत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये सतत पराभव होत असल्याने पक्षाने नवा मार्ग स्वीकारावा असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.

सोलापूर जिल्ह्यात सातशे एकरावर
माळरान विकसित करणार

सोलापूर जिल्हा माळरानासाठी प्रसिध्द आहे. ही ओळख अधिक दृढ व्हावी, माळरानाची परिस्थिती विकसित व्हावी यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ही संकल्पना असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माळरान आहे. सातशे एकरावर माळरान विकसित केले जाणार आहे. या गवतामुळे जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर भूजल पातळीत वाढ होते. या व लागवडीमुळे गवत चारा उपलब्ध होऊ शकेल, पर्यायी पशुपालकांचे स्थलांतर थांबेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन
बंडोपाध्याय यांनी घेतली निवृत्ती

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना सेवानिवृत्तीच्या तोंडावर कार्मिक मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची विशेष सल्लागार म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. याचवेळेस त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी हरिकृष्ण व्दिवेदी यांची नियुक्ती केली आहे. कार्मिक मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांनुसार आलापन यांनी मुख्य सचिव म्हणून तीन महिन्यांचा सेवाविस्तार सोडून सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतली
दोन वाजेपर्यंत खुली राहणार

महाराष्ट्रात कोरोनाचा वेग कमी होताच सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवलं असलं तरीसुद्धा अनेक गोष्टींमध्ये मोकळीक दिली आहे. त्यातच बीएमसीने ब्रेक द चेन ऑर्डर जारी केली आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेतली दुकाने रोज सकाळी सातपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार. इतर दुकानांसाठी बीएमसीनं वेगळे नियम जारी केलेत. त्यात कॅटरींगपासून ते इतर दुकानं, जी रोडच्या डाव्या बाजुला आहेत, ती सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ओपन राहतील तर जी रस्त्याच्या उजव्या बाजुला दुकानं आहेत, ती मंगळवार आणि गुरुवारी सुरु असतील.

पुण्याच्या शहरी भागातील
निर्बंध अंशत: उठवले

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पुण्याच्या शहरी भागातील निर्बंध अंशत: उठवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने उघडणार आहेत. या दुकानांसाठी सरसकट सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. पुण्यातील ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा
नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार

जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार केला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळेगाव येथे ही घटना घडली. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.