गौतम बुद्धानंतर सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पातळीवर सम्यक दृष्टीने काम करणारे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल. डॉ.बाबासाहेबांनी केलेले कार्य प्रचंड आणि वैविध्याने परिपूर्ण असेच आहे. त्यांच्या क्रांतीपूर्ण जीवनाची अनेक दालने आहेत. अर्थशास्रज्ञ, राजकारणी, घटनाकार, पत्रकार, संपादक, समाजशास्रज्ञ, कायदेतज्ञ जलव्यस्थापन तज्ञ, दलित उद्धारक, अशी अनेक बिरुदे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला लावता येतील.
आपल्या कार्याच्या सुरवातीलाच त्यांनी आपल्या ज्ञाती बांधवाना ” शिका , संघटित व्हा, संघर्ष करा ” हा मोलाचा मंत्र दिला. तत्कालीन समाजव्यवस्थेत नाकारलेल्या वंचित असलेला हा दलित समाज अज्ञान आणि अशिक्षितपणाला बळी पडलेला असताना देखील केवळ या एका मंत्रामुळे त्यांनी त्यांना वरच्या अवस्थेला आणून सोडले. सुरवातीला दलितांच्या उद्धाराकरिता त्यांनी आल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. नंतरच्या काळात सामाजिक कार्यासोबतच आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगतीकरता चातुर्वर्ण आणि अस्पृश्यता निवारण हे उदात्त ध्येय ठेवले होते.
९ मार्च १९२४ रोजी डॉ .बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. यावेळी शिक्षण हे उन्नतीचे साधन आहे आणि त्याशिवाय प्रगती होऊ शकणार नाही. असा विचार मांडल्याचे दिसते. तत्कालीन दलित समाजाच्या प्रगतीच्या वाटा यामुळे मोकळ्या झाल्यात. प्रत्येक मनुष्याच्या अंगी कोणत्यातरी एका गोष्टीत दुसऱ्याला मागे टाकण्याची शक्ती स्वाभाविकच असते असा सवसाधारण नियम आहे. जर त्याला पद्धतवार शिक्षण मिळाले तर तो दुसऱ्याला मागे टाकल्यात शंका नाही. शिक्षणाच्या उच्च टोकावर पोहचल्यानेच समाजाचा दर्जा वाढतो म्हणूनच विद्या विनय आणि शील रुजविण्यासाठी मिलिंद आणि सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती केलीअसे डॉ .बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात.
डॉ .आंबेडकरांच्या क्रांतीपूर्ण जीवनकार्याची जी अनेक दालने आहेत त्यापैकी अस्पृश्यांची उन्नती होणे करिता आत्मभान जागविणारे हे कार्य सरकार आणि वरिष्ठ हिंदु समाजावर अवलंबून असणारे कार्य आहे. हे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे कि सतीप्रथा बंदीचा कायदा जसा केला त्याप्रमाणे ब्रिटिश सरकार अस्पृश्यता निवारण करू शकले असते. परंतु सती प्रथा बंदी बाबत जशी उदासीनता दाखविली गेली त्याचप्रमाणे अस्पृश्यता निवारणाबाबत झाले. शेवटी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली. हे अधिक सोयीचे झाले परंतु ब्रिटिश अमदानीत महत्त्वपूर्ण कार्य झाले ते म्हणजे ब्रिटिशांनी सार्वत्रिक शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या. त्यामुळेच आत्मजाणिवेच्या भावना निर्माण होऊन वैचारिक चिंतनाची प्रक्रिया सुरु झाली. आचार, विचार, उच्चरातील वैगुण्ये लक्षात येऊ लागल्याने परिवर्तनाच्या दिशेने समाजाची वाटचाल सुरु झाली.
अस्पृश्यता हा हिंदू समाजाला लागलेला रोग आहे आणि मन परिवर्तनाच्या माध्यमातून हा रोग बरा करता येईल असे डॉ. आंबेडकरांचे सुरुवातीचे मत राहिले आहे. त्या करीता अनेक कार्यक्रम आणि सत्याग्रह केले. परंतु महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह प्रसंगी अस्पृश्यता निवारण्याबाबत ब्राह्मणेतरांची भूमिका लक्षात आल्याने आता अस्पृश्यांमध्ये स्वाभिमानाचा संचार झाला. तरच उन्नतीसाठी ते प्रयत्नशील होतील अशीच चळवळ पुढे गेली पाहिजे या करिताचे प्रयत्न दिसून येतात. कोणताही समाज आत्मजाणिवेशिवाय प्रगतीकडे वाटचाल करू शकत नाही आणि आत्मोद्धराची चळवळ हि अस्पृशावरचा निर्भर असल्याने शिक्षणामुळे स्वाभिमान वाढविण्याचे कार्य त्यांनी केले.
भगवान बुद्ध आणि महात्मा फुले व संत काबिर यांनी गुरुस्थानी मानलेले भगवान बुद्ध म्हणतात , शिक्षण म्हणजे प्रकाश असतो आणि तो प्रत्येकाने स्वतः
शोधला पाहिजे.
विद्या नसेल तर बुद्द्धीमत्ता नाही ,योग्य आचरण नाही अपेक्षित प्रगती नाही आणि संपत्ती व मालमत्ता देखील मिळविता येत नाही. यांच्या अभावामुळेच शूद्रांना सामाजिक दर्जा प्राप्त होणार नाही. त्यामुळे अज्ञानरूपी हा मळ दूर झाला पाहिजे. याकरिताच सार्वत्रिक शिक्षणाचे महत्त्व जाणणारे डॉ. आंबेडकर हे समाज शिक्षण तज्ज्ञ होते.
मार्गी अंधसरिसा पुढे देखनाची चाले जैसा
आज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा आचरोनी
सज्ञानी गृहस्थांनी अंध:काराने घेरलेल्या समाजाला मार्ग दाखविला पाहिजे. आणि हाच आचरण धर्म आहे. त्यामुळेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांतीचा मूलाधार शिक्षण हाच आहे, असा विचार डॉ. आंबेडकर मांडतात.
वेद पठणाचा अधिकार नाकारल्यामुळे बहिष्कृत जातींना फरक पडत नव्हता परंतु शिक्षणाचा अधिकार व मानवी क्षमतांच्या विकासाची संधी नाकारली जाणे याचा विपरीत परिणाम खालच्या जातीच्या नशिबी अशिक्षितपणा कायमचा लिहिला जाणे असा झाला त्यामुळेच ब्राम्हणेत्तर समाज मागासलेला राहून त्याची उन्नती खुंटली. हे निर्विवाद सत्य असल्याचे डॉ. आंबेडकर नमूद करतात.
स्वतः चा उद्धार करून घेण्यासाठी शिक्षण हे महत्वाचे साधन आहे. अशा प्रकारची जाणीव ठेऊन परिश्रमपूर्वक ज्ञान ग्रहण केले पाहिजे आणि यामुळेच स्वत्व व स्वत्वाची जाणीव होते. १४ नोव्हेबर १९५४ रोजी हैद्राबाद येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले माझ्यावेळी परिस्थिती फार कठीण होती. दहा बाय दहाची एक खोली होती त्यात कुटुंबातील सामान दहा माणसे ,एक बकरी आणि दोन पैशाची चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थिती अभ्यास केला आणि मी फार अभ्यास केल्यामुळेच लोक मला भितात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा शिक्षण विषयक विचार मानवमुक्तीचा विचार आहे. त्यातूनच माणसाचे महत्व वाढते. जाती व्यवस्था आणि गुलामगिरीला नाकारून नवसमाज निर्मितेच्या क्षमता प्राप्त करता येतात.
प्रा. विलास चव्हाण ,धुळे
संदर्भ
१ डॉ. आंबेडकरांची भाषणे.
२ मुकनायक व बहिष्कृत भारत शासन प्रकाशित अंक.
३ मुक्ती कोण पथे – डॉ.आंबेडकर
४ जाती व्यवस्थेचे विध्वंसन – डॉ.आंबेडकर
५ धम्मपद – डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन