आज मध्यरात्रीपासून
कडक निर्बंध
राज्यामध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशानं 22 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. साथरोग नियंत्रण कायदा 1897 मधील कलम 2 आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीतून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर अनेक उपाययोजना लागू केल्या जात आहेत.
१ मे पासूनच्या लसीकरणासाठी
२४ एप्रिलपासून नोंदणी होणार
१ मेपासून आता खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये देऊन लस घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच ४५ वर्षांहून अधि वयाच्या सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरूच राहील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी १ मे पासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणाबाबत माहिती दिली. दरम्यान, १ मे पासूनच्या लसीकरणासाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. लस बनवणाऱ्या कंपन्या आपल्या उत्पादनाच्या ५० टक्के लस राज्य आणि रुग्णालयांना देणार आहेत. लसीच्या किमती त्यांनी आधीच घोषित कराव्या लागणार आहेत.
कोरोनाची दुसरी लाट
डिसेंबर पर्यंत ओसरेल
भारतात गेल्या वर्षी फेबुवारी-मार्चमध्ये आलेली कोरोनाची पहिली लाट नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आटोक्यात आली. आता दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. त्यामुळे ही लाट कधी संपेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, ही लाट ओसरण्यास डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तविला आहे. यंदा २०२१ च्या अखेरपर्यंत कोरोना परिस्थिती थोडी स्थिर होईल. त्यानंतर साधारणतः २०२२ च्या मध्यात संपूर्ण जग कोरोना मुक्त होईल, त्यामुळे सध्या तरी कोरोनाविरुद्धची ही लढाई भारताला युद्धपातळीवर लढावी लागणार आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा
राज्यात तुटवडा राहणार
रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात बंद करुन उत्पादन वाढविल्यानंतरही राज्यात तुटवडा राहणार आहे. तशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने रेमडेसिविरच्या वितरणाचे नियंत्रण घेतल्याने हा तुटवडा राहणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या घटनेप्रकरणी
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये झालेली ऑक्सिजन गळती आणि त्यामुळे २४ रुग्ण दगावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वायूगळतीस हलगर्जीपणा कारणीभूत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफआयआर मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. तूर्त भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
विश्व हिंदू परिषदेने देणगी दिलेले
२२ कोटी रुपयांचे चेक बाउन्स
अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. मंदिर निर्माणासाठी देशभरातून अनेकांनी देणगी दिलेली आहे. परंतु बांधकामासाठी विश्व हिंदू परिषदेने देणगी दिलेले २२ कोटी रुपयांचे १५ हजार चेक बाउन्स झाले आहेत. राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या एका लेखापरीक्षण अहवालात ही बाब सांगण्यात आली आहे. खात्यांमध्ये कमी रक्कम असल्याने किंवा तांत्रिक त्रुटींमुळे चेक बाउन्स झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. या चेकपैकी जवळपास दोन हजार चेक अयोध्येतून जमा झाले आहेत, अशी माहिती न्यासाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले.
लसींच्या १७१० डोसची चोरी
लसींची गरज कशी भागवायची, याचं नियोजन प्रशासनाकडून सुरू असताना आता चोरट्यांची नजर कोरोनाच्या लसींकडे वळली आहे. हरयाणातल्या एका रुग्णालयातून चोरट्यांनी चक्क लसींचा साठा लांबवला आहे. एकूण १७१० डोसची चोरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पैसे किंवा इतर मेडिसिनला चोरट्यांनी हातही लावला नसल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. लसीच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर लसीच्या डोसची चोरी होण्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या
प्रचारातून काँग्रेसची माघार
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्राचारातून काँग्रेसने पूर्ण माघार घेतली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगालमध्ये प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. राहुल गांधी स्वतः कोरोना बाधित झाले आहेत. आता पुढील दोन महत्त्वाच्या टप्प्यात मतदान बाकी असताना कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने काँग्रेसने प्रचारातून पूर्ण माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसने निवडणूक प्रचारातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
तोंड स्वच्छ धुतल्यानेही कोरोनाचा
प्रादुर्भाव कमी करता येऊ शकेल
कोरोनाविरोधात लढा देताना अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आणखी उपायांवर संशोधन सुरू आहे. या सगळ्या कसरतीत तोंड स्वच्छ धुतल्यानेही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकेल, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. या सोप्या पद्धतीमुळे घातक विषाणूला तोंडाद्वारे फुफ्फुसात जाण्यास रोखता येऊ शकेल. शिवाय रुग्णाला गंभीर होण्यापासूनही वाचवता येईल. माउथवॉशची मदत होऊ शकेल.
आशिष येचुरी यांचे
कोरोनामुळे निधन
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आशिष येचुरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तशी माहिती सीताराम येचुरी यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. आशिष यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि सर्व कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. आशिष यांचे वय ३५ वर्षे होते. आशिष यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्वाती, वडिल सीताराम येचुरी, आई इंद्राणी आणि बहिण अखिला असा परिवार आहे.
अमेरिकेने भारताला ‘करन्सी
मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं
भारतावर चलनासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत अमेरिकेने भारताला करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं आहे. या यादीत भारतासह जगभरातील एकूण 10 देशांचा समावेश आहे. भारताला या करन्सी मॅनिप्युलेटर्सच्या यादीत टाकल्यानंतर भारताने अमेरिकेच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच यामागील तर्क कळत नसल्याचं मत व्यक्त केलं. भारताचे व्यापार सचिव अनुप वाधवा म्हणाले, “अमेरिकेच्या या निर्णयात मला कोणताही तर्क दिसत नाहीये. रिझर्व्ह बँक बाजाराच्या स्थितीनुसार चलन साठ्याला परवानगी देण्याच्या धोरणाला परवानगी देते.”
गजा मारणे मिरवणूक प्रकरणी
खासदार काकडे यांना अटक !
कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे. याच रॅलीच्या संदर्भात संजय काकडे यांना अटक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
ऑक्सिजन पुरवठ्यावरुन सुप्रीम
कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
ऑक्सिजन, औषधं तसंच इतर महत्वाच्या साधन सामुग्रीच्या पुरवठ्यावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काय तयारी केली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. यामध्ये लसीकरणाचाही समावेश आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने करोनाच्या तयारीसंबंधी सध्या सहा राज्यांमधील उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याची दखल घेतली.
SD social media
9850 60 3590