मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढलं असून, शनिवारी ३ हजार ६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेनं मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत. सहा दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १३ हजार ९१२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.
वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कंटेनमेंट झोन तयार केले जात आहे. त्याचबरोबर मॉल्स, सिनेमागृहांसह गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहे. मागील सहा दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते. तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्च रोजी त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून, ३०५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. पालिके ने दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मॉलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी करोना प्रतिबंधासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मॉल आणि मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत असून नियम-निर्बंध धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालिके च्या विभाग कार्यालयांमार्फत चाचण्या केल्या जाणार आहेत.