गेल्यावर्षी तीन नवे कृषी कायदे पास केल्यानंतर देशभरातून त्याचा जोरदार विरोध झाला, काँग्रेसनेही त्याचा कडाडून विरोध केला. कृषी कायद्यांवर चर्चा न करता लागू केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आता कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकावरही चर्चा केली नाही, चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतले असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय.
विनाचर्चा कृषी कायदे मागे घेतल्यावरून राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार चर्चेला घाबरत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. सध्या दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीचं मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आज अधिकृतरित्या कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. कृषी कायदे मागे घेताना चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र सरकारनं घाबरून चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतल्याचा निशाणा राहुल गांधी यांनी साधला आहे.
आज कृषी कायदे मागे घेतानाही संसदेत जोरदार गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. या गोंधळातच कृषी कायदे मागे घेण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. कृषी कायदे मागे घेणं हे शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं यश असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लखीमपूर खिरातील शेतकऱ्यांच्या हत्या आणि आंदोलनात शहिद झालेले शेतकरी यांच्यावर चर्चा होणं आवश्यक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकार संभ्रमात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. सरकार शेतकरी आणि कामगारांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जर काय चुकीचं झालं होतं तर त्यावर चर्चा आवश्यक होती, आणि जर चुकीचं झालं नव्हतं तर मोदींनी माफी का मागितली? असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.