सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीनंतर गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यासह मालिका २-१ ने जिंकली. भारताने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताने हा सामना ९१ धावांनी जिंकला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही टी२० मालिका गमावलेली नाही.
भारताकडून हार्दिक पांड्या, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर अक्षर पटेलने एक गडी बाद केला. श्रीलंकेचे सलामीवीर कुशल मेंडिस आणि पथुम निसंका यांनी सुरुवातीला फटकेबाजी केली. मात्र अक्षर पटेलने पाचव्या षटकात ही जोडी फोडत कुशल मेंडिसला बाद केलं. त्यानतंर अर्शदीपने पथुम निसंकाला शिवम मावीकडे झेल देण्यास भाग पाडलं. तर अविश्का फर्नांडो हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला.
फिरकीपटू युझवेंद्र चहलने दोन षटकात धनंजय डि सिल्वा आणि चरिथ असलांका यांना तंबूत धाडलं. त्यानतंर वानिंदु हसरंगा उमरान मलिकच्या गोलंदाजीवर दीपक हुडाकडे झेल देऊन बाद झाला. तर चमिका करुणारत्नेला हार्दिक पांड्याने शून्यावर पायचित केलं. भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने महीश तीक्षणाचा २ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानतंर अर्शदीपच्या गोलंजाजीवर कर्णधार दासुन शनाका उंच फटका मारण्याच्या नादात अक्षर पटेलकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर दिलशान मधुशंकाला बोल्ड करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २२८ धावा केल्या. श्रीलंकेला आता विजयासाठी २२९ धावांची गरज आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत शतक साजरं केलं. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याआधी भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन फक्त एका धावेवर बाद झाला. त्याने पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवर धनंजय डि सिल्वाकडे दिला. इशान किशन बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी सहाव्या षटकात बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर शुभमन गिलनेसुद्धा फटकेबाजी केली. शुभमन गिल ३६ चेंडूत ४६ धावा काढून बाद झाला. त्याने सूर्यकुमार यादवसोबत १११ धावांची भागिदारी केली. शुभमन गिलनंतर हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा हे दोघेही प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत तुफानी ११२ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ७ चौकार अन् ९ षटकारांची आतषबाजी केली. तर अक्षर पटेलने ९ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या.
भारत – प्लेइंग इलेव्हन
ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी , उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन
पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महीश तीक्ष्णा, कसुन रजिता, दिलशान मधुशंका.