संजू सॅमसन वर सुनील गावसकर चांगलेच भडकले

RCB ने 10 विकेट राखून राजस्थानवर मोठा विजय मिळवला. राजस्थानचं 177 धावांचं आव्हान, विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल या सलामीच्या जोडीनेच पार केलं. RCB चा हा सलग चौथा विजय ठरला. त्यामुळे RCB गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. दरम्यान, या सामन्यानंतर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे एका भारतीय खेळाडूवर चांगलेच भडकले.

याच कारनाम्यांमुळे हा तरुण खेळाडू भारतीय संघात अद्याप स्थान मिळवू शकला नाही, असं सुनील गावसकर म्हणाले. हा खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन होय. संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने पंजाबविरुद्ध 119 धावा ठोकल्या होत्या. मात्र त्यानंतर संजूच्या बॅट तळपलीच नाही. पुढच्या तिन्ही सामन्यात संजू 4,1 आणि 21 धावा करुन माघारी परतला. त्याच्या खेळीमध्ये सातत्य नसल्याने, सुनील गावसकर भडकले.

सुनील गावसकर म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे कर्णधाराला सुरुवातीपासून संघाचा मोर्चा सांभाळावा लागतो. संजू पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळला. मात्र त्यानंतर सातत्याच नाही. हीच त्याची समस्या आहे. त्यामुळेच तो भारतीय संघात स्थान मिळवू शकत नाही”

संजूची बॅट तळपणे आवश्यक
राजस्थान रॉयल्सला चमकदार कामगिरी करायची असेल, तर कर्णधार संजू सॅमसनची बॅट तळपणे आवश्यक आहे, असंही सुनील गावसकर म्हणाले. “संजू सॅमसन एका सामन्यात धावा करतो, दुसऱ्यामध्ये फ्लॉप ठरतो. त्याचं हे असंच सुरु असतं. संजू हा राजस्थानचा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने धावा करणं हे संघासाठी आवश्यक आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर आता संजूवर आणखी जबाबदारी आली आहे. कर्णधारपदाचं उदाहरण सिद्ध करण्याची संधी त्याच्याकडे आहे”, असं सुनील गावसकरांनी सांगितलं.

फिनिशरची कमतरता
राजस्थानकडे डेव्हिड मिलर आणि क्रिस मॉरिससारखे खेळाडू आहेत, जे आक्रमक फलंदाजी करु शकतात. पण संजूला पहिल्या फळीत धावा करुन, चांगली सुरुवात करुन द्यावी लागेल. कारण त्यांच्याकडे चांगला फिनिशर नाही, असा सल्ला गावसकरांनी दिला.

राजस्‍थान रॉयल्‍सने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. त्यामुळे गुणतालिकेत राजस्थान सर्वात शेवटी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.