पाकिस्तान महिला क्रिकेट टीममधील सदस्यांना कोरोनाची लागण

पाकिस्तान महिला क्रिकेट महिला टीममधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वतयारीसाठी संघातील खेळाडू कराचीतील हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये जमले होते. बुधवारी टीममधील सर्व सदस्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 3 जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान पीसीबीने ज्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्या तीन खेळाडूंच्या नावांची माहिती दिलेली नाही. या खेळाडूंना आता 10 दिवस कडक आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. या खेळाडूंचा क्वारंटाईन पुढील महिन्यात 6 नोव्हेंबर रोजी संपेल.

कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत टीमच्या उर्वरित सदस्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना दर दुसऱ्या दिवशी कोरोनाची चाचणी करावी लागेल. शिबिरासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मे महिन्यात प्रत्येकाचं कोरोना लसीकरण करण्यात आलं होतं.

वेस्ट इंडिजचा महिला संघ एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघ 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर सामने खेळवले जातील. यापूर्वी पाकिस्तानने वेस्ट इंडिजमध्ये तीन टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळले होते. पाकिस्तानचा पुरुष संघ T20 विश्वचषक स्पर्धेसाठी UAE मध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.