ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. आता हा पराभव विसरून न्यूझीलंडविरुद्ध 3 मॅचची टी-20 क्रिकेट सीरिज खेळण्यास टीम इंडिया सज्ज आहे. या सीरिजसाठी निवडण्यात आलेले तीन भारतीय खेळाडू टीम इंडियासाठी अडचणीचे ठरू शकतात.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचच्या टी-20 सीरिजमधील पहिली मॅच 18 नोव्हेंबर 2022 रोजी खेळवली जाणार आहे. या सीरिजसाठी अनेक तरुण खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ही सीरिज जिंकण्याचा संकल्प आहे. पण, या टीममधील 3 खेळाडू या संकल्पात अडथळा ठरू शकतात.
कॅप्टनचं टेन्शन वाढणार
टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार या सीरिजमध्ये टीमचा एक भाग आहे. भुवनेश्वर कुमार सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. परंतु 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला असे करण्यात अपयश आले. या स्पर्धेत भुवनेश्वर कुमारनं 6 मॅचमध्ये केवळ 4 विकेट घेतल्या होत्या. त्याची ही खराब कामगिरी न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये भारताला महागात पडू शकते.
टीम इंडियाचा युवा फास्ट बॉलर उमरान मलिकला न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. मलिक हा भारतातील सर्वात फास्ट बॉलर्सपैकी एक आहे. मात्र तो अद्याप टीम इंडियासाठी खेळताना स्वतःची चमक दाखवू शकलेला नाही. उमराननं टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 टी-20 मॅच खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्यानं 12.44 च्या इकॉनॉमीनं रन दिले असून केवळ 2 विकेट घेतल्यात. आता न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये तो रन वाचवू शकला नाही, तर हे कॅप्टन हार्दिक पंड्यासाठी मोठं टेन्शन ठरेल.
टी- 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये रवींद्र जडेजाच्या जागी खेळलेला अक्षर पटेलदेखील फॉर्ममध्ये नाही. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्हीमध्येही अपयश आले. या स्पर्धेत त्यानं फक्त 9 रन केले आणि 3 विकेट्स घेतल्या. अक्षरला टीममध्ये ऑलराउंडर खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही.
न्यूझीलंड विरुद्धची टी-20 सीरिज जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमला खूपच मेहनत करावी लागणार आहे. कारण टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमची कामगिरी ही खूपच चांगली ठरली होती.