विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार

राज्यसभा निवडणुकीत जोरदार आपटी खाल्ल्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसनं दुसरा उमेदवार कायम ठेवल्यानं आता येत्या 20 जूनला विधानपरिषदेची निवडणुकीचा सामना रंगणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं फोडून भाजपनं (BJP) चमत्कार घडवला. कमी संख्याबळ असतानाही धनंजय महाडिकांना विजयी केलं. आता त्याच चमत्काराची पुनरावृत्ती घडवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी उचलला आहे. आघाडीच्या आमदारांमध्ये धुमसत असलेल्या असंतोषाचा राजकीय लाभ उचलण्याची भाजपची रणनीती आहे.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आघाडीचे 6 आणि भाजपचे 5 असे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

विधानपरिषदेत विजयासाठी 27 मतांचा कोटा आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना निवडून आणण्या इतकं राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे. मात्र खडसेंना पाडण्याची मास्टर प्लॅनिंग भाजपनं केल्याची सूत्रांची माहिती आहे.

तर ही शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी खडसेंचा कोटा वाढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप असे दोन उमेदवार रिंगणात ठेवून रिस्क घेतलीय. भाजपनं प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार देऊन निवडणुकीतली चुरस कायम ठेवलीय. दहाव्या जागेसाठी भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड या तुल्यबळ उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होईल, अशी अपेक्षा आहे.

राज्यसभा निवडणूक खुल्या पद्धतीनं होऊनही भाजपनं अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं आपल्याकडं खेचली. विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान होणार असल्यानं महाविकास आघाडीला आणखी मोठा सुरूंग लावण्याची तयारी भाजपच्या चाणक्यांनी आखलीय.

तर घोडेबाजाराला बळी पडल्याचा आरोप करून संजय राऊतांनी अपक्षांना आणखी दुखावलंय. त्यामुळं भाजपच्या डावपेचांचा मुकाबला मविआ करू शकेल का? राज्यसभा निवडणुकीतल्या पराभवानं खचलेली शिवसेना काँग्रेसला मदतीचा हात देणार का? याचा फैसला 20 जूनला होणाराय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.