पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील घोटकी इथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सर सय्यद एक्स्प्रेसची मिल्लत एक्स्प्रेसला धडक दिली. रेती ते धारकी स्टेशन दरम्यान हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवाय (ARY) न्यूजच्या वृत्तानुसार, या बातमीचे वृत्त समजताच मदत आणि बचाव दल घटनास्थळी रवाना झाले आहे.
हा अपघात इतका भयंकर होता की, एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली आणि डब्ब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात ही सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.
सिंध प्रांतात असलेल्या घोटकी जिल्ह्यात दोन रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्यांची जोरदार धडक झाली. सर सय्यद एक्स्प्रेस रेल्वेने मिल्लत एक्स्प्रेसला धडक दिल्याने गाडी रुळावरून घसरली, अशी माहिती घोटकी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उस्मान अब्दुल्ला यांनी दिल्याचे असोसिएटेड प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. यावेळी परिसरातील नागरिक मदतीसाठी पुढे सरसावलेत. मृत आणि जखमी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात गावकऱ्यांनी मदत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.