दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात धडकणार. 5 जूनला कोकणात तर 7 जूनला मुंबईत दाखल होणार. 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज. उकाड्यांनं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात धडकणार आहे. तर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होईल.
दरवर्षी 10 जूनपर्यंत मुंबईत पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. मान्सूनचा प्रवास समाधानकारक असून 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचं राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत चांगली वाटचाल केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी झाला असला तर पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात अनेक भागात गेली दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला. कोकणात मात्र 25 मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात 25 मेनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तर दुसरीकडे देशात उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांत पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
देशातील उत्तरेकडील भागात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी भागात पाऊस होत असून, 23 मे रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, चंडीगड, दिल्ली, बिहार, झारखंड आदी राज्यांतही पाऊस आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आदी राज्यांतही पाऊस आहे.