महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही. नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 12 वर्षाच्या सुखीसंसारानंतर हे दोघेही विभक्त होत आहेत. या दोघांनाही दोन जुळ्या मुली असून या दोन्ही मुली आई स्मितासोबत इंदौरला राहतात.
स्मिता गटे या सनदी अधिकारी आहेत. सप्टेंबर 2019 मध्येच या दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं होतं. मात्र, त्याबाबत नितीश भारद्वाज यांनी आता खुलासा केला आहे. नितीश भारद्वाज यांनी स्मितापासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मी सप्टेंबर 2019मध्ये स्मितापासून वेगळं होण्यासाठी मुंबईतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. आम्ही का वेगळं होत आहोत, त्याबाबत मी बोलू शकत नाही. मात्र, सध्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात पेंडिंग आहे. पण घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल असतो. जेव्हा तुम्ही अगदी एकटे होता तेव्हा याची अधिक जाणीव होते, एवढंच मी सांगू इच्छितो, असं नितीश भारद्वाजने म्हटलं आहे.
माझा लग्न संस्थेवर भरोसा आहे. परंतु, माझ्या नशीबात ते नव्हतं. घटस्फोटाची अनेक कारणे असतात. कधी कधी तुमच्या अॅटिट्यूडशी तुम्ही तडजोड करत नसता, तर कधी कॅम्पेशनची कमी असते. कधी तुमचा अंहकार आडवा येतो तर कधी तुमचे विचार जुळत नाहीत. जेव्हा तुमचे नाते तुटते, तुम्ही विभक्त होता, तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो. मुलांवर या गोष्टींचा वाईट परिणाम होतो. त्याला जबाबदार पालकच असतात, असंही त्याने म्हटलं आहे.
जुळ्या मुलींशी संवाद होतो का? असा सवाल केला असता, त्यावर मी काहीच बोलू इच्छित नाही. माझ्या मुलींशी बोलण्याची मला मुभा आहे की नाही यावर मी बोलणार नाही, असं सांगतानाच नातं तुटल्यानंतर मी स्मिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही, असंही त्याने सांगितलं.