देशाच्या कोणत्याही भागांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा अद्याप नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली आहे. केंद्र सरकार सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. हर्षवर्धन यांनी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली.
हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून अनेक त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचं कारण असल्याचं अधोरेखित केलं. हर्षवर्धन यांनी यावेळी कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती दिली.
सध्या परिस्थिती नियंत्रणात
“गेल्या दोन महिन्यात देशातील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. अँक्टिव्ह रुग्संख्या कमी असून रिकव्हरी रेट ९२.३८ आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील मृत्यूदर १.३० टक्के आहे,” अशी माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली. आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे, एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटतं सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेलं धोरण आपण नीट राबवलं तर संख्या कमी होईल,” असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.