धीरगंभीर आवाजाचे धनी हरीश भिमानी यांचा आज वाढदिवस

कोरोना संकटामुळे का होईना, दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा घरा-घरात महाभारत आणि रामायण नव्यानं पाहिलं गेलं. विशेष म्हणजे पूर्वी ज्या एकोप्यानं अख्खं कुटुंब महाभारत पाहत होतं, त्याच पद्धतीनं लॉकडाऊनच्या कारणामुळे घरातील सगळी मंडळी एकत्र येऊन महाभारत पाहू लागली. या निमित्तानं पुन्हा घरा-घरात तोच आवाज घुमला.. मै समय हूं.. धीरगंभीर शैलीत महाभारताचं कथानक सांगणारा हा आवाज म्हणजे या मालिकेचा जणू आत्माच आहे. महाभारतातले अनेक किस्से एका सारगर्भित संदेशासोबत जोडण्याचं काम या आवाजानं केलं. हा आवाज देणारा कलाकार कधीही पडद्यासमोर आला नाही, मात्र कलाकारांपेक्षाही जास्त लोकप्रियता त्यानं मिळवली.

या धीरगंभीर आवाजाचे धनी आहेत हरीश भिमानी (Harish Bhimani). आज 15 फेब्रुवारी या त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कलाकाराच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाशझोत…

मूळ राजस्थानचं घराणं, जन्म व कर्मभूमी महाराष्ट्र
हरीश भिमानी यांचं घराणं मूळ राजस्थानमधील जैसलमेरचं होतं. त्यांचे पूर्वज गुजरातमधील मांडवी आणि नंतर कोलकात्याला स्थायिक झाले होते. हरीश यांचा जन्म मुंबईचा. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई आणि पुढे लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर येथे त्यांचं शिक्षण झालं.

पुढे जमनालाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टटीजमध्ये त्यांनी एमबीए केलं. सुरुवातीला टीव्ही वृत्तपत्र निवदेकाच्या भूमिकेत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेद्वारे त्यांच्या आवाजाची जादू घराघरात पोहोचली असली तरीही त्यांनी इतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये आवाज दिला आहे.

हरीश यांनी 22 हजारांहून अधिक रेकॉर्डिंग केल्या आहेत. 1980 च्या दशकानंतर त्यांनी अनेक सार्नजनिक ठिकाणी कार्यक्रम घेतले. अनेक ठिकाणी प्रभावी निवेदकाची भूमिका साकारली. त्यानंतर अनेक डॉक्युमेंट्री, कॉर्पोरेट फिल्म, टीव्ही, रेडिओवरील जाहिराती, खेळ, संगीत अल्बममध्ये त्यांनी आवाज दिला. 2016 मध्ये मराठी डॉक्यू फीचर ‘ मला लाज वाटत नाही ‘ याला सर्वोत्कृष्ट व्हॉइस ओव्हर म्हणून हरीश भिमानी यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.

एका मुलाखतीदरम्यान, हरीश भिमनी यांनी सांगितले की, महाभारत मालिकेसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची चाचणी सुरु होती. हरीश भिमानी यांनी ती दिली. तीन दिवसांनंतर महाभारतात शकुनी मामांचे पात्र साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचा त्यांना फोन आला. त्यांना मालिकेत आवाज देण्यासाठी बोलावून घेतले आणि नेमका कशा पद्धतीने संपूर्ण महाभारताचे कथानक अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे, याबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी अत्यंत समर्पण पूर्वक हे काम केले आणि महाभारतातला हा आवाज अजरामर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.