राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना भीती लसीकरण बंद पडण्याची…

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे 40 लाख लसींच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. हा पुरवठा वेळेत झाला नाही तर महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकते अशी भीती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली. “प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

“लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लसीकरण महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. पण लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी पोटतिडकीने विनंती केली आहे. खासकरुन कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे. का देऊ नये हा भागही आग्रहपूर्वक मांडला. लस दिली तर मोठा प्रश्न सुटेल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

“सर्वात जास्त फिरणाऱ्यांमध्ये आणि कोरोना होणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील लोक आहेत. यामुळे या वयोगटाचं इंफेक्शन कमी करायचं असेल तर त्या पद्दतीने लवकरच १८ पुढील सर्वांचं लसीकरण गरजेचं आहे. ही काळाची मागणी आहे. इतर ठिकाणी उशीर करा पण राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं आहे त्यामुळे लवकर परवानगी द्या अशी मगाणी केली,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. “”महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो,” असं ते म्हणाले.

लॉकडाऊन हा शब्द वापरू नका

यावेळी त्यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असं आवाहन केलं. केवळ शनिवारी व रविवारी लॉकडाउन आहे.. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असं त्यांनी सांगितलं. “गरज लागल्यास ऑक्सिजनचं प्रमाण इंडस्ट्रीसाठी शून्य करुन टाकू, ऑक्सिजनचा लागणारे स्टीलचे प्लांट बंद ठेवू…पण ऑक्सिजन कमी पडू देणार नाही,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. थोडी जरी लक्षणं जाणवली तर लगेच चाचणी करुन घ्या. अंगावर दुखणं काढू नका असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.