बरेच लोक विणकामाकडे आजीबाईचं किंवा वृद्धांचं काम म्हणून पाहतात, ज्या आपल्या नातवंडांसाठी आकर्षक रंगात मफलर किंवा स्वेटर विनतात. मात्र एक तरुण आहे, ज्याने चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी विणकाम हा छंद म्हणून निवडला. विशेष बाब म्हणजे आता तो यातून पैसेही कमवू लागला आहे. कर्नाटकातील हुबळी येथील सोहेल नरगुंद या २८ वर्षीय तरुणाने गेल्या वर्षी यूट्यूब ट्यूटोरियलमधून विणकाम शिकण्यास सुरुवात केली आणि तो लगेचच हे शिकला.
सोहेल नरगुंद हा व्यवसायाने अभियंता असून बंगळुरू येथे काम करतो. तो नैराश्य आणि चिंतेत होता. यामुळे त्याने विणकामाचा छंद जोपासला. यातून बाहेर पडण्यासाठी विणकामाचा उपयोग होईल, असं त्याने कुठेतरी वाचलं होतं. यूट्यूबवर ट्यूटोरियल पाहिल्यानंतर त्याला विणकामाची सवय लागली आणि लगेचच त्याला हे काम चांगल्या प्रकारे जमू लागलं. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला, की त्याने त्याच्या बहिणीसाठी स्वेटर विणायला सुरुवात केली आणि तिला ते खूप आवडलं. त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीलाही तिच्यासाठी एक स्वेटर हवं होतं आणि ती पैसे द्यायला तयार होती. त्यामुळे त्याला आपल्या छंदाचे रुपांतर व्यवसायात करण्याची कल्पना सुचली ज्यातून तो थोडीफार कमाईही करु शकेल.
the_rough_hand_knitter नावाने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे आणि त्याला 13,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्या एका व्हिडिओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात तो बंगळुरूमध्ये कॅबमध्ये बसून विणकाम करताना दिसत आहे.
आपल्या छंदाबद्दल अधिक बोलताना, त्याने सांगितलं की त्याचे वडील आणि बहीण त्याला खूप साथ देतात. त्याचे वडील त्याला सूत वळवण्यासाठी मदत करतात तर त्याची बहीण ऑर्डर सांभाळते. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईचं निधन झालं आणि विणकामाची ही कला आपण तिच्याकडून शिकू शकलो नाही, याची त्याला खंत आहे. प्रौढांसाठी स्वेटर विणण्यासाठी त्याला 16-17 दिवस लागतात तर लहान मुलांसाठी 10-12 दिवस लागतात, असं त्याने सांगितलं. तो शक्यतो घराबाहेर बसून स्वेटर विणतो. अशात त्याला हे विणताना पाहिल्यावर लोकही सकारात्मक प्रतिक्रिया देतात, असं त्याने सांगितलं. “मी दररोज किमान तीन तास या छंदात गुंततो कारण यामुळे मला शांत राहण्यास मदत होते,” असं त्याने सांगितलं.