उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. तिथल्या प्रसिद्ध असलेल्या बालाजी मंदिरातून लाखो रुपये किमतीच्या मूर्तींची चोरी करण्यात आली होती. आता मात्र या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. माणिकपूर शहरातल्या महावीर नगर वॉर्डात असलेल्या महंत यांच्या घराबाहेर एका पत्रासह त्या चोरी झालेल्या मूर्ती सापडल्या आहेत. त्यानंतर महंतांनी पोलिसांना कळवून मूर्ती त्यांच्या ताब्यात दिल्या; मात्र अद्यापही अष्टधातूच्या काही मौल्यवान मूर्ती सापडलेल्या नाहीत. यानंतर महंत रामबालक दास यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘या घटनेचा लवकरात लवकर उलगडा झाला नाही तर ते मोठे आंदोलन करतील.’
कोतवाली परिसरातल्या तरौहान येथे असलेल्या शेकडो वर्षं जुन्या बालाजी मंदिरातून 9 मे रोजी काही मूर्तींची चोरी झाली होती. यामध्ये अष्टधातू, पितळ आणि तांब्याच्या एकूण 16 मूर्ती चोरीस गेल्या होत्या. मंदिराचं कुलूप तोडून चोरट्यांनी अष्टधातूपासून बनवलेली 5 किलो वजनाची प्रभू श्रीरामाची मूर्ती चोरली. त्याचबरोबर पितळेची राधाकृष्ण मूर्ती, बालाजीची मूर्ती, लाडू गोपाळाची मूर्ती यांसह रोख रक्कम व चांदीच्या वस्तू चोरून नेल्याचं मंदिराचे महंत रामबालक दास यांनी सांगितलं. पुजाऱ्याची पत्नी सकाळी मंदिरात स्वच्छता करण्यासाठी पोहोचली, तेव्हा मंदिराचं कुलूप तुटलेलं होतं आणि मंदिरात ठेवलेल्या मूर्ती गायब होत्या.
या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडित महंत यांनी कर्वी कोतवालीला तक्रार दिली. त्याचबरोबर चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात काही व्यसनी व्यक्तींनी दारू आणि जुगाराचे अड्डे बनवले आहेत आणि त्यांनीच मंदिरात चोरी केली आहे.
अष्टधातूच्या दोन मूर्ती अजूनही आहेत गायब
या चोरीस गेलेल्या मूर्ती शनिवारी (14 मे) माणिकपूर येथील महंत रामबालक दास यांच्याच घराबाहेर सापडल्या. याबद्दल माहिती देताना महंतांनी सांगितलं, की ते सकाळी गायींना चारा आणि पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना तिथे एक पत्र पडलेलं दिसलं. या पत्रामध्ये मूर्तींचा उल्लेख करून चोरट्यांनी असं लिहिलं होतं, की मूर्ती चोरल्यानंतर त्यांना झोप लागत नाहीये आणि भीतिदायक स्वप्नं पडत आहेत. म्हणूनच ते मूर्ती परत करत आहेत. या पत्रामध्ये चोरट्यांनी अशी विनंतीदेखील केली आहे की, महंतांनी त्या मूर्ती पुन्हा मंदिरात स्थापित कराव्यात. पत्र वाचून महंतांनी मूर्तीची शोधाशोध केली असता त्यांना घराबाहेर एका टोपलीखाली ठेवलेल्या पोत्यात मूर्ती सापडल्या. यामध्ये त्यांना पितळ आणि तांब्याच्या 12 मूर्ती सापडल्या; मात्र अष्ट धातूच्या दोन मूर्ती सापडल्या नाहीत. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस मुख्यालयात पोहोचल्यानंतर मूर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्या.